माजी आ.दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत घेतला समाचार
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
पाचोरा-भडगाव मतदार संघातील भडगाव येथे शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी होणारा शेतकरी मेळावा हा महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे सोमवारी, २६ ऑगष्ट रोजी भडगाव येथे होणार आहे. मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भडगाव शेतकी संघ व पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आ.किशोर पाटील यांनी केले. स्व.आर.ओ.पाटील हे वैशाली सूर्यवंशी यांचे वडील असले तरी ते माझे ‘राजकीय बाप’ आहेत. त्यांचा आदर आणि आदर्श आयुष्यभर माझ्या व माझ्या परिवाराच्या ह्रदयात राहणार असल्याचे सांगत माजी आ. दिलीप वाघ आणि वैशाली सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार आ.किशोर पाटील यांनी घेतला. शिवालय येथे शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. पत्रकार परिषदेला माजी.जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, प्रकाश तांबे, युसुफ पटेल, लखीचंद पाटील, मनोज सिसोदिया, राहुल पाटील, भडगाव शेतकी संघाचे चेअरमन भैय्या पाटील, मा.नगराध्यक्ष संजय गोहिल, चंद्रकांत धनवडे, हेमंत चव्हाण, किशोर बारवकर आदी उपस्थित होते.
उबाठा सेनेची गुरुवारी सभा झाली. सभेत वैशाली सूर्यवंशी यांनी वाचून भाषण केले. त्यांनी नेहमीप्रमाणे तात्यांचा फोटो लाऊ नका, असाही दम दिला. मला सुरूवातीला वाटले होते की, ताई लहान आहे. ती राजकारणात अपरिपक्व आहे. त्यांना अनुभव नाही. पण त्या प्रत्येक वेळेस भाषण देतांना ज्या पध्दतीने वाचून बोलतात. जे भाषण लिहुन देतात, ती त्यांच्या डोक्याने काम करीत आहे. त्यांच्या मनाने काम करीत आहे. माझे कार्यकर्तेही तात्यांचा आदर करत राहतील. गेल्या २५ वर्षात मी माझ्या कामातून माझी स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. पण आजपासून स्व.आर.ओ.तात्या पाटील यांचा फोटो की कुठेही वापरणार नाही. कोणत्याही राजकीय व्यासपीठावर मी फोटो वापरणार नाही. आज तात्यांच्या फोटोचे पूजन करून सन्मानाने तो फोटो त्यांच्याकडे पाठवित असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.
अनादर करणे ही माझी संस्कृती नाही
माजी आमदार दिलीप वाघ यांनीही गुरुवारी घेतलेल्या मेळाव्यात जी वक्तव्य केली. त्याबद्दल बोलतांना आ.पाटील म्हणाले की, मतदार संघात तुम्ही ज्येष्ठ आहात. तुमचा अनादर करणे ही माझी संस्कृती नाही. पण आपण केलेल्या आरोपांचे उत्तर देणे अपेक्षित आहे. दिलीप वाघ यांचे राजकीय दुकान बंद झाले होते. मी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी बसविले.तो कार्यकाळ काढला तरी पुष्कळ आहे. त्यांनी भाषणाची सुरूवात करतांना आज जे बोलेल ते खरे बोलेल, असे वक्तव्य केले. मग इतके दिवस ते खोटे बोलत होते का? असा प्रश्न मला पडला आहे. त्यांनी मतदार संघाचा इतिहास सांगितला. त्यात स्व. के.एम. बापू पाटील यांच्याबाबत आम्ही नेहमी गौरवोद्गगार काढतो. त्यांनी बहुळा धरणावर बांधलेल्या बंधाऱ्याला आम्ही ‘कृष्णासागर’ हे नाव दिले. हा त्यांचा सन्मानच आहे. मात्र, ते धरण होऊ नये, यासाठी शिंगाडा मोर्चा काढणाऱ्यांमध्ये ओंकार आप्पा आणि तुम्ही होतात, हे विसरू नये, असेही आ.किशोर पाटील म्हणाले.
आप्पांचे माजी आ.दिलीप वाघ यांना खुले आवाहन
२०११ मध्ये झालेल्या प्रकरणाची आठवण आपण २०२४ मध्ये करून देत आहात आणि म्हणतात मला फसविण्यात आले. तेव्हा तुम्ही अल्पवयीन होतात का? मी मतदार संघात गेल्या २५ वर्षापासून राजकारण करत आहे. दरवर्षी नवीन उपक्रम घेत असतो. यावेळेस मी लाडक्या बहिणींना साड्या दिल्या. ते देण्याची द्यानत माझ्यात आहे. तुम्हाला फक्त घेणे समजते. काचेच्या घरात राहुन आमच्यावर दगडफेक करु नका. विकासावर आणि टक्केवारीवर त्यांनी बोलुच नये. आगामी सभांमध्ये मी आपल्या सर्वच विषयांवर बोलुन आ. किशोर पाटील यांनी माजी आ.दिलीप वाघ यांना पत्र परिषदेद्वारे खुले आवाहन दिले आहे.