साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यात येत्या रविवारी, ३ मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिओ टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार नानासाहेब आगळे होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय पहूरचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे प्लस पोलिओ मोहिमेचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले.
जामनेर शहरात १९ तर ग्रामीण भागात २०७ पोलिओ केंद्र अश्या २२६ पोलिओ केंद्रावर एकाच दिवशी तालुक्यातील ३७ हजार २२९ बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी ६२६ सदस्यांची नेमणूक केली आहे. ४३ पर्यवेक्षक हे पर्यवेक्षणाचे काम करणार आहेत. प्रवाशी, स्थलांतरित, भटके, जिनिंग, शेतमजूर, वीटभट्टी असलेल्या भागासाठी ११ मोबाइल व ९ ट्रान्सझीट टीमची नेमणुक केली आहे.
बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्याचे आवाहन
पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयाच्या बालकांना पोलिओ लसीचा डोस द्यावा, बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी किंवा यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळेे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, ग्रामीण रुग्णालय पहूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा, बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील, रत्ना चौधरी, संघमित्रा सोनार यांच्याकडून केले आहे.