साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील ‘परिवर्तन’ आयोजित सहा दिवसीय ‘मैत्र -महोत्सवा’चा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.२९ रोजी सायंकाळी ६.30 वाजता येथील उदयोन्मुख रंगकर्मी तथा सुप्रसिध्द नृत्यकार ‘तनय मल्हारा’ चे एकलनाट्य “दंद्व” या रंगावृत्तीने होणार आहे.
आयुष शर्मा द्वारा लिखित व दिग्दर्शित तसेच “तनय मल्हारा” द्वारा रंगमंचावर खेळले गेलेले “दंद्व” एक असे नाटक आहे कि जे भूतकाळ व वर्तमान स्थितीतील राजनैतिक, धार्मिक अन काल्पनिक परिस्थितिला जाब विचारत, थेट धर्म अन अधर्माच्या पिंजऱ्यात नेऊन उभे करते. कधी परस्परांना जोडते..अन पुन्हा मुळापासून तोडते.. भले कुणाला महाभारत माहित असो वा नसो.. मात्र आजच्या नाटकातील “तनय” अभिनित “द्वंद” मधील साकारलेला ‘कर्ण’ तुम्हाला प्रश्न विचारत काहीसा अस्वस्थ अन अंतर्मुख करेलच.. अन तसे झाले नाही तर , हे ‘एकल-नाट्य’ सगळ्यात मोठे ‘द्वंद’ ठरेल यात शंकाच नाही. या मधे कर्ण आणि कृष्ण, गांधी आणि आंबेडकर हे पात्र ही सोबत खेळत राहतात.
याआधीही तनय मल्हारा या कलावंताने या एकल-नाट्यांचे मुंबई व विविध शहरात आतापर्यंत सहा प्रभावी प्रयोग केले आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळालाय. येथील काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान येथील अम्फी थियेटर मध्ये गुरुवार दि.२९ रोजी सायंकाळी ६.30 वाजता या महोत्सवी प्रयोगाद्वारे सातवे पुष्प गुंफत तो जळगावच्या रंगभूमीवर रसिकांसमोर प्रथमच आपली कला सादर करणार आहे. या एकल-नाट्यांस जास्तीत जास्त जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.