साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील प्रताप हायस्कुलमध्ये गेल्या १६ जानेवारीपासून पाच दिवशीय तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले जात आहे. प्रशिक्षणाचा समारोप शनिवारी, २० रोजी होणार आहे. हा प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षणाला जवळपास २०६ शिक्षक सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणात मुलांना एकतर्फी शिकविण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होईल, क्षमता विकसित होतील, आपल्या समोरील आव्हाने स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील, स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, यासाठी शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाची रचना केलेली आहे. यामध्ये व्हिडिओ पाहून त्यावर चिंतन व आपले विचार स्वाध्यायाच्या स्वरूपात लिहिणे हा प्रशिक्षणाचा आत्मा आहे. प्रशिक्षणाला तालुका गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील हे स्वतः वेळोवेळी भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षणाला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख शरद सोनवणे, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, मुख्याध्यापक भगवान पाटील, चंद्रकांत देसले, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, सुनील काटे, महेंद्र रत्नपारखी धुरा सांभाळत आहेत. यासाठी अमोल पाटील, महेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.