भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षकांना मनसेतर्फे दिले निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एमआयडीसी परिसरातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांच्या पगारातून दरमहा नियमितपणे भविष्य निर्वाह निधी म्हणून रक्कम कपात केली जाते. मात्र, ही कपात केलेली रक्कम संबंधित कंपन्यांकडून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली जात नसल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कामगारांच्या कपातीच्या भविष्य निर्वाह निधी रकमेबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसेने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन जळगाव भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षकांना बुधवारी, २० ऑगस्ट रोजी देण्यात आले. निवेदन देतेवेळी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, दीपक राठोड, साजन पाटील, जितेंद्र पाटील, भूषण ठाकरे, विकास ऐश्वर्या, श्रीराम विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.
कामगारांच्या कष्टाने मिळविलेल्या पगारातील रक्कम कपात करूनही संबंधित निधी कार्यालयात जमा केला गेला नाही, ही बाब गंभीर आहे. तसेच कामगारांवर अन्याय करणारी आहे. भविष्य निर्वाह निधी हा कामगारांच्या भविष्याची सुरक्षितता, निवृत्तीनंतरचा आधार व आपत्कालीन परिस्थितीतील हक्काचा बचाव आहे. त्या निधीची चोरी अथवा अडवणूक करणे हे कामगारांच्या जीवनाशी खेळ करण्यासारखे आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील अशा सर्व खासगी कंपन्यांची तपासणी करून ज्यांनी कामगारांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधी रक्कम अद्याप जमा केलेली नाही, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात नमूद केली आहे.
कार्यालयाच्या निष्क्रियतेविरुध्द तीव्र आंदोलनाचा इशारा
संबंधित कंपन्यांना रक्कम तातडीने भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच, भविष्यात कोणतीही कंपनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी रक्कम थकवणार नाही, त्याची कठोर अंमलबजावणी करावी. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही कामगारांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून आपले हक्क बजावेल. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या निष्क्रियतेविरुध्द तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला आहे.कामगारांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा त्यांचा हक्क आहे. त्या हक्कासाठी लढणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधिलकी आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.