‘Take Flight, Sister’ : ‘लेवा सखी घे भरारी’च्या कार्यक्रमात सखींनी केली आनंदाची उधळण

0
20

विविध उपक्रमांनी सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

शहरातील हतनूर सांस्कृतिक सभागृहात स्वामिनी फाउंडेशन संचलित ‘लेवा सखी घे भरारी’चा सातवा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण आफ्रिकेत ९० कि.मी.ची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या ६५ वर्षीय विद्या बेंडाळे, डॉ. रती महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनासह दीप प्रज्ज्वलनाने झाली. वर्धापनदिनाचा कार्यक्रम सर्व सखींच्या हृदयात अतिशय आनंदाची उधळण करून गेला. सर्व सखींनी रोजच्या धकाधकीच्या जीवनात सिद्ध होण्यासाठी आनंदी क्षण पुन्हा हृदयात भरून घेतले.

यावेळी ॲड. भारती ढाके यांनी मनोगतात लेवा पाटीदार समाजात आदर्श विवाह पद्धती अंमलात आणून स्वतः आणि आपल्या नातेवाईकांनाही आदर्श विवाह पद्धतीद्वारे विवाह पार पाडण्यासाठी बाध्य करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. सुमारे दोन-अडीचशे लेवा सखींच्या प्रेमळ साथीसह योगदानाने सात वर्षांचा प्रवास संस्मरणीय झाला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांसह सातवा वर्धापन दिन करण्यात आला. विविध झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात काव्यवाचन, रॅम्प वॉक, नृत्य व गीत सादरीकरण यांचा समावेश होता.

नृत्याविष्कारातून घडविले सणवारांचे दर्शन

यावेळी काशीबाई शाळेच्या माजी मुख्याध्यापिका पुष्पा पाटील यांनी सुंदर कविता सादर करून रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळविला. तसेच कवयित्री शीतल पाटील यांनी खास लेवा गणबोलीतील ‘घोरनारा’ कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच शीतल पाटील, उज्ज्वला महाजन, खुशबु राणे, वंदना पाटील, वर्षा राणे, तेजस्विनी पाटील, तनुजा वाघुळदे यांनी नृत्याविष्कारातून १२ महिन्यातील सणवारांचे दर्शन घडविले. त्यानंतर रॅम्प वॉकही केला. ‘गोरी तेरे नैना’ गीताच्या नृत्यातही शीतल पाटील यांनी मैत्रिणींसह सहभाग घेतला. त्या सर्वांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

सामाजिक कार्यक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच स्टेज डेअरिंगसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, असे डॉ.वर्षा चौधरी यांनी मनोगतात सांगितले. तसेच त्यांच्यातर्फे बक्षीसेही देण्यात आली. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल ‘लेवा सखी घे भरारी’ तर्फे सेजल किनगे, हितांश पाटील, रितीशा भोळे, कुबेर फालक, ठाकूरजी अट्रावलकर, ॲड.प्रसाद ढाके, काव्या फालक, दुष्यंत महाजन, दीपमाला काळे, हेमलता वाणी यांना बक्षीसे देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी ‘लेवा सखी घे भरारी’च्या विद्यमान अध्यक्ष पूजा महाजन, स्मिता पाटील, जयश्री पाटील, डॉ.भावना चौधरी, उज्ज्वला महाजन, कामिनी धांडे, ॲड.भारती ढाके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सांगता लीना नेमाडे, वृषाली नेमाडे यांच्या गीत गायनासह नामजपाने झाली. प्रास्ताविक संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील तर सूत्रसंचालन कामिनी धांडे, प्राजक्ता चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here