जनक्रांती मोर्चातर्फे पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
धरणगाव येथील पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख मुकुंद शामराव नन्नवरे (रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना ५ जून ते २३ जूनपर्यंत रात्री-अपरात्री गुंड प्रवृत्तीच्या अज्ञाताने भ्रमणध्वनीद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याबाबत पाळधी पोलीस दुरक्षेत्रात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा होऊनही त्याच्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने जळगावचे पोलीस अधीक्षक यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
धमकीमुळे मुकुंद नन्नवरे यांचे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. तसेच कुटुंबात भीतीसह दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीची तातडीने चौकशी करून त्याच्यावर कारवाई करून त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे संस्थापक-प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, जगदीश सपकाळे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, विदांत सपकाळे, विजय करंदीकर, सोमा भालेराव, महेंद्र केदारे आदींनी केली आहे.