साईमत, चोपडा : प्रतिनिधी
महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या विरोधात शुक्रवारी, २९ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या ४ सप्टेंबर २०२३ रोजी निळे निशाण संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले. त्या प्रकरणाच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेने पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलन करून व त्या आशयाचे लेखी निवेदन देवून केली. तसेच पुढील पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. माहितीस्तव निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहाराद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच कुठलीही कारवाई न झाल्यास याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. निवेदन देतेवेळी शहर पोलीस स्टेशनला पोलीस उपअधीक्षक कृषिकेश रावळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, येत्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी अशोक तायडे, दिवाणजी साळुंखे, अनिता बाविस्कर, बबिता बाविस्कर, गीता वाघ, पिंकी सुतार, इंदिरा कोळी, विद्या बाविस्कर, चारु सोनवणे, वैशाली हिरोळे, अशोक तायडे, विलास तायडे, चंद्रकांत सोनवणे, इकबाल तडवी, आबीद कुरेशी, प्रवीण करनकाळ, उदय मोरे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.