साईमत, नाशिक : प्रतिनिधी
येथील तालुका क्रीडासंकुलात लिंबाच्या झाडाला मुलीचे छायाचित्र, अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले साहित्य आढळून आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, संतापही व्यक्त होत आहे.येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
शहरातील क्रीडासंकुलात हा प्रकार लक्षात येताच जागरूक नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले. त्यावरून कार्यकर्त्यांनी पाहणी करून अघोरी विद्येचा प्रकार असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव उदयकुमार कुऱ्हाडे व येवला शाखेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली.त्यांनी तत्काळ हवालदार गेठे व गायकवाड यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. झाडाला लावलेला ताइत, मुलीचे छायचित्र, लटकवलेली चिठ्ठी ताब्यात घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान दाखवत रक्षाबंधनाच्या बहीण-भावाच्या पवित्र नात्याच्या दिवशी समाजात कोणतीही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली.
हे कृत्य कोणत्या व्यक्तीने केले हे निश्चित नसल्याने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या अर्जाच्या आधारे तपास करून या कृत्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकाराने फक्त अंधश्रद्धा पसरते, सामाजिक तेढ निर्माण होते. याव्यतिरिक्त कोणतेही लाभ होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा कृत्याला बळी पडू नये, अथवा भविष्यात असे कृत्य करू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव उदयकुमार कुऱ्हाडे, आयुब शहा, आजिनाथ आंधळे, भीमसेन कोपनर, प्रशांत शिंदे उपस्थित होते.