साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा व तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित केला आहे. त्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, भुसावळचे शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) उपस्थित होते.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करून महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी राष्ट्रवादी पक्ष जोडला आहे. पक्षाकडून शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडण्यासाठी शिवराय केंद्रीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.
स्वराज्य सप्ताहात गावागावात मुख्य चौकात स्वराज्य पताका लावून वातावरण निर्मिती करणे, शिवरायांच्या प्रमुख किल्ल्यांचे सेल्फी पॉर्इंट लावणे, शिवरायांच्या जीवनावर आधारित गाणी वाजवत फिरणारी गाडी तयार करून त्यात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे आवाहन व स्वराज्य शपथचे पत्रक वाटप करणे, विविध उपक्रम व त्यात सहभागी लोकांचा ‘एक मेळावा रयतेचा मेळावा’ संकल्पनेखाली आयोजित करणे, विविध स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्यांना सन्मानित करून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देणे तसेच मेळाव्यात ‘शिवरायांचं राज्य हे बहुजनांचं राज्य-रयतेचे राज्य’ संकल्पनेवर व्याख्यान आयोजित करणे, शासनाच्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती पत्रक व फलकांद्वारे जनतेपर्यंत पोहचविणे, शिवराय व त्यांची प्रेरणा असलेले संत तुकाराम महाराज यांचा धागा जोडत तुकाराम महाराजांची गाथा वाटप करणे, त्याचप्रमाणे महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, बालकांसाठी बालशिवाजी वेशभूषा स्पर्धा आयोजित करणे आणि विद्यार्थ्यांसाठी ‘रयतेचं राज्य शिवरायांचं’ विषयावर वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे उमेश नेमाडे यांनी सांगितले.