साईमत जळगाव प्रतिनिधी
मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर तब्बल दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना शरण आले. दुपारी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, निलंबित निरीक्षक बकाले यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाले यांना न्यायमूर्तींच्या निवासस्थानी हजर करण्यात आले.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज टाकण्यात आला होता. परंतू तेथे देखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता. निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सुमारे दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होते, त्यांचा कसून शोध सुरू असतानाही ते यंत्रणेला सापडत नव्हते. पोलिस यंत्रणेवर यामुळे टिकेची झोडही उठली होती.
स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले हे सोमवारी पोलिसांपुढे हजर झाले. दरम्यान, जळगाव पोलिस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत यांच्याकडे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांच्यापुढे त्यांचा जवाब घेण्यात आला.
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती मात्र दरवेळी बकाले हे चकवा देण्यात यशस्वी होत होते.
स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. आपल्या सभोवताच्या अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले यांनी सोमवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.
न्यायाधीशांनी सुनावली कोठडी
निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर त्याबाबतची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजात आजही संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बकाले पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे प्रचंड पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपासाधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यावेळी उपस्थित होते.