जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातून मुलाने पित्याच्या डोक्यात फावडे घालून यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपी मुलाला पोलिसांनी पाचोरा येथून रात्री अटक केली आहे. पहूर पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शेंदुर्णी येथील शेतकरी नाना बडगुजर (वय ८२) हे शनिवारी सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा संशयित कैलास नाना बडगुजर (वय ५६ वर्षे) हा शेतात आला आणि पित्यासोबत वाटणीवरून वाद घालू लागला.पिता नाना बडगुजर यांनी नकार दिला असता त्यांंच्यात शाब्दीक वाद झाला. संतप्त मुलगा कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावड्याने डोक्यात जोरात वार केला. नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले.
संशयितांचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. त्यांनी ही घटना बघताच धाव घेत वडीलांच्या हातून पावडे हिसकावून जखमी आजोबाला सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघून संशयित मुलगा कैलास याने याने शेतांमधुन पळ काढला.
या घटनेची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आली. शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील, पोकाँ. प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत यांना पहुर ग्रामिण रुग्णालयात हलविले आणि घटना स्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले.दिवसभर संशयित मुलगा कैलास बडगुजर याचा शोध सुरु करून पथके रवाना करण्यात आली.
पाचोरा येथून घेतले
संंशयिताला ताब्यात
घटनेची फिर्याद संशयितांचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.रात्री उशिरा संशयित कैलास बडगुजर यांस पाचोरा येथून ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहे.
