साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाटणाच्या जंगलात चंदनाच्या झाडाची तस्करी करणाऱ्या टोळीतील एका संशयित आरोपीला वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले होते. तेव्हा त्याला ४ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
सविस्तर असे की, चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव- प्रभारी) डी. के. जाधव हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह २ सप्टेंबर रोजी सायंकाळी नियतक्षेत्र पाटणा यामधील राखीव वनकक्ष क्रमांक ३०५ मध्ये जंगल भागात गस्त घालत होते. अशातच त्यांना डोंगरी नदीवरील भागात अज्ञात असल्याचा भास झाला. मग त्यादिशेने पाठलाग केला. चंदन तस्करी करणाऱ्या तिघांपैकी एक जण मिळून आला. त्याचे नाव विचारल्यावर सखाराम श्रावण गावंडे (रा. अंबाना ठाकूरवाडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील दोन कुऱ्हाड, करवत, नायलॉनची पिशवी व इतर साहित्य हस्तगत केले. त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. एका आरोपीला चार दिवसांची वन कोठडी सुनावली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
