२० हजारांचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील तांबापुरा भागातील मच्छीमार्केट परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरातून अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. दरम्यान, संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईमुळे तांबापुरा परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तांबापुरा परिसरात एक जण गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी त्वरित पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांबापुरा परिसरात धाड टाकली. पोलिसांनी शासकीय वाहन लांब उभे करून पायी चालत संशयित घराची पाहणी केल्यावर एक तरुण हातात गोणी घेऊन बसलेला आढळला.
गोणीतून ३ किलो गांजा हस्तगत
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव शेख अशपाक शेख मेहमुद (वय २३, रा. मच्छीबाजार, तांबापुरा) असे सांगितले. त्याच्याकडील गोणीची तपासणी केल्यावर त्यात गांजा असल्याचे त्याने मान्य केले. त्याच्याकडून किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, चेतन पाटील करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि गणेश वाघ, चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, एमआयडीसी पोलीस पथकाने केली आहे.
