साईमत, जळगाव : प्रतिनिधी
गेल्या ३२ वर्षापासून साप्ताहिक, सायंदैनिक आणि सध्या नियमित दैनिक असा दमदार आणि विश्वासार्ह प्रवास करून वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या साईमत समूहाच्या कार्यकारी संपादक पदावर ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल हे रुजू झाले आहेत. सोबतच साईमत समूहात वाणिज्य संपादक म्हणून विवेक ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साईमत मीडिया प्रा.लि. कंपनीचे संचालक व संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी दोघांना सूत्रे बहाल करत समूहात स्वागत केले. यावेळी साईमतचे व्यवस्थापक सुनील अहिरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे, उपसंपादक राकेश कोल्हे, शरद भालेराव, जाहिरात विभागाचे विजय महाजन, वितरण प्रमुख शशिकांत राजवैद्य आदी सहकारी उपस्थित होते.
सुरेश उज्जैनवाल व्यासंगी अन् अनुभवी पत्रकार
गेल्या ३० वर्षापासून विविध आघाडीच्या मराठी दैनिकात अभ्यासू व व्यासंगी शैलीचे पत्रकार म्हणून श्री. उज्जैनवाल कार्यरत आहेत. राजकीय,कृषि आणि सहकार या क्षेत्रात परखड पद्धतीने विपुल लिखाण त्यांनी केले आहे. केळी हा बातमीचा विषय होऊ शकतो हे सांगणारे पहिले पत्रकार म्हणून सुद्धा श्री. उज्जैनवाल यांचा लौकिक आहे.केळी उत्पादक शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यासाठी विविध विषयांवर आधारित राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पाच ठिकाणच्या केळी परिषदामध्ये माध्यम प्रतिनिधी म्हणून श्री.उज्जैनवाल यांनी सहभाग नोंदवला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण नोंदीच्या आधारे केळी काढणी पश्चात तंत्रज्ञानात शेतकऱ्यांपर्यंत सोपी माहिती पोहचवण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे.सामाजिक प्रश्नांची जाण असलेले पत्रकार म्हणून तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शिफारसीवरुन श्री. सुरेश उज्जैनवाल यांची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सोशल रिसर्च अँडव्हायझरी कमिटीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती, या समितीवर सुद्धा त्यांनी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या यासंबंधी अनेक अहवालात आवश्यक सूचना नोंदवत बदल घडवून आणले.आता सुरेश उज्जैनवाल यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ साईमत समूहाला होणार आहे.साईमतची परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी झोकून काम करणार असल्याचे उपस्थित सहकाऱ्यांसमोर श्री.उज्जैनवाल यांनी बोलून दाखवले.
विवेक ठाकरे पत्रकारितेत कल्पकतेच्या जोरावर बिझनेसचे मास्टर
जिल्ह्यातील मूळ निंभोरा स्टेशन या गावापासून आपल्या पत्रकारितेचा श्रीगणेशा केलेले विवेक ठाकरे यांनी गावाचा वार्ताहर ते थेट जळगाव येथे दैनिक देशोन्नतीच्या आवृत्ती संपादक पदापर्यंत आपल्यातील व्यावहारिक गुणांच्या जोरावर मजल मारली होती. गेल्या अठ्ठावीस वर्षात त्यांनी देशोन्नतीशिवाय लोकपत्र दैनिकत निवासी संपादक, दैनिक देशाधारचे मुख्य संपादक,मुंबई येथील प्रहार वृत्तपत्राचे खान्देश ब्युरो चीफ अशा विविध पदांवर काम केले आहे. सद्या विवेक ठाकरे यांचे स्वतःच्या मालकीचे पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयातून ग्रामगौरव मासिक प्रकाशन असून राज्यातील ग्रामीण विकासात शाश्वत काम केलेल्यांची सकारात्मक दखल घेऊन राज्यभरातील ग्रामपंचायतीपर्यंत हे मासिक पोहचत आहे.श्री. ठाकरे हे साईमत समुहाच्या दैनिक,ऑनलाईन न्यूज आणि युट्यूबसाठी प्रचलितपेक्षा वेगळ्या पद्धतीने जाहिरात व्यवसाय हाताळणे, वाणिज्य धोरणातून रीडर कनेक्ट इन्िसिटिव्हवर संपादक म्हणून काम करणार आहेत.विविध कल्पनांच्या आधारे जाहिरात व्यवसाय सेट करतांना एक वाचकप्रिय आणि शासन – प्रशासनात लोकाभिमुख दैनिकाची अढळ असलेली साईमतची प्रतिमा आणखी उजळ करण्यावर भर असल्याचे श्री.ठाकरे यांनी वाणिज्य संपादक म्हणून सूत्रे सांभाळल्यावर स्पष्ट केले.