जळगावमध्ये संवेदनशील केंद्रांची स्वतः केली पाहणी
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येलाच रस्त्यावर उतरून सुरक्षा व्यवस्थेचे तपशीलवार नियोजन केले.
बुधवारी, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी शहरातील विविध संवेदनशील परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवर लावलेल्या बॅरिकेट्स, पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि इतर सुरक्षा उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. अधीक्षकांनी खात्री केली की सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या ठिकाणी वेळेत पोहोचले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी व्यवस्था योग्यरित्या लागू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १६९ मतदान केंद्रांपैकी २२ संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करून कोणत्याही उपद्रवाचे प्रतिबंध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
निवडणूक सुरक्षित पार पडण्यासाठी संपूर्ण शहरात १,१५० पोलीस कर्मचारी, १,१४० होमगार्ड, एसआरपीएफच्या २ कंपन्या, ६ पोलीस उपअधीक्षक आणि ६० वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत. पोलीस प्रशासनाच्या या काटेकोर तयारीमुळे नागरिकांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
डॉ. रेड्डी म्हणाले, “शहरात शांततामय मतदान वातावरण ठेवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मतदान करावे.”
