साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
यावल रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणालगत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयामार्फत २ ते ६ मे २०२४ पर्यंत वयोगट ८ ते १४ वर्षाखालील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन केले आहे. त्यात मुलांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्याच्या दृष्टीने संगीताच्या तालीवर व्यायाम कवायत विविध स्वरूपाचे चर्चासत्र, गीत, नृत्य, नाटिका यांचे प्रशिक्षण सोबतच छोट्या-छोट्या गोष्टीतून संस्कार मनोरंजनात्मक खेळ हे विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन स्थिर राहण्यासाठी व त्यांच्यातील चंचलता दूर होण्यासाठी ध्यान, धारणा मेडिटेशनवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुलांचे आरोग्य व संतुलित आहार याविषयी तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण जागर प्रतिष्ठान व शैक्षिक आगाजचे नाना पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व वृक्षारोपण कसे करावे, कलम कसे लावावे, याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सीड बॉल कसे तयार करावे, त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पालकांनी आपल्या पाल्यांना समर कॅम्पसाठी सेवाकेंद्र यावल रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाशेजारी पाठवावे. समर कॅम्पची वेळ सकाळी ९.३० ते १२ अशी राहील, असे सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका ब्रह्माकुमारी सिंधू दीदी, ब्रह्माकुमारी ज्योती बहन, अन्य प्रशिक्षण ब्रह्माकुमारी बहिणींनीही सांगितले. तसेच संस्कारक्षम असलेल्या विनामुल्य समर कॅम्पमध्ये सहभाग घ्यावा. संपर्कासाठी ८०८७५७७५२०, ७०२८८८४८३० वर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेटावे, असेही आवाहन केले आहे.