फ्लोरेन्स नाईंटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुजाता बागुल यांचा सत्कार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दै. ‘साईमत’ने म्हणजे माध्यम जगताने फ्लोरेन्स नाईंटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुजाता बागुल यांच्या कर्तृत्वाची घेतलेली दखल समाजातील सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्याची पाऊलवाट प्रशस्त करण्यासारखी ठरली आहे. त्यामुळेच माझ्या दृष्टीने हा सत्कार म्हणजे ‘लाखमोलाचा’ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते एमआयडीसीतील ‘साईमत’च्या मुख्य कार्यालयातील सभागृहात मंगळवारी, १० जून रोजी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सुजाता बागुल यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छासह साडी चोळी देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, व्यवस्थापक सुनील अहिरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे, मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती हारुन नदवी, जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी तसेच सुजाता बागुल यांचे पती नितीन सुरवाडे, वडील अशोक बागुल, बहिण प्रियंका बागुल, भाऊ महेंद्र बागुल, वहिनी अश्विनी बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, त्यांना पुरस्कार मिळाल्याची माहिती मला जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाल्यावर मी मनोमन आनंदीत झालो होतो. माझा जिल्हा ह्या भगिनीने देशपातळीवर नेल्याचा तो आनंद होता. त्यांचा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातही सत्कार केला होता. पुरस्काराने सन्मान झाल्यावर आता पुढच्या काळात कोणत्याही कारणाने कुणालाही माझ्या कामावर बोट ठेवण्याची संधी मिळायला नको. सगळ्या कसोट्यांवर माझे कर्तृत्व सदैव उजळून निघाले पाहिजे, असा दबाव येतो. त्याचवेळी मी माझे निर्विवाद कर्तृत्व सिध्द केले म्हणून पुरस्काराने माझा सन्मान झाला, असा अहंकारही विजेत्याच्या मनात डोके वर काढू शकतो. त्यामुळे सम्यक बुध्दीनेच पुरस्कारानंतरची वाटचाल त्या विजेत्याने सुरु ठेवणे हिताचे ठरते. तुम्ही समाजापुढे एकदा आदर्श ठरल्यावर सदैव समाज तुम्हाला आदर्शांच्या कसोटीवरच तोलत असतो. ह्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारचे जवळपास १६ पुरस्कार लाभले आहेत. गेल्या काळात जिल्हा प्रशासनातील माझ्या अधिनस्थ असलेली कार्यालये कशा पध्दतीने सक्रीय असावीत, याबाबतीत आम्हाला ज्या अपेक्षा आहेत.त्या अपेक्षांना साजेसेच सुजाता बागुल यांचेही काम आहे. जिल्ह्यातील कुणीतरी देशपातळीवर चमकत का नसावे?, ही खंत सुजाता बागुल यांच्या रूपाने दूर झाली, असेही ते म्हणाले. यशस्वीतेसाठी दै.‘साईमत’च्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.
इतरांना प्रोत्साहनाची अपेक्षा
यानंतरच्या सेवाकाळात सुजाता बागुल यांनी आपली जबाबदारी सांभाळून जिल्ह्यातील परिचारिकांनीही हा पुरस्कार मिळविण्याचे ध्येय निश्चित करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली. तसेच सत्काराला उत्तर देतांना सुजाता बागुल यांनीही दै.‘साईमत’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करुन सर्वांचे आभार मानले. तसेच मला मिळालेल्या पुरस्कारानंतर आता यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यातील तळमळ, धडपडीचे उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
कर्तव्यनिष्ठेला ‘सलाम’…!
प्रास्ताविकात कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल म्हणाले की, केवळ बातम्या देणे किंवा जन सामान्यांचे प्रश्न मांडणे एवढी मर्यादित भूमिका दैनिक ‘साईमत’ची नाही तर समाजात जे जे घटक, संस्था, व्यक्ती जिल्ह्याचा लौकिक, स्वाभिमान वाढवत असतील तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या परिश्रमाचे, गुण वैशिष्ट्याचे कौतुक करणे आपलं कर्तव्य ठरते, असे ‘साईमत’चे धोरण आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून परिचारिका सुजाता बागुल यांचा सत्कार, सन्मान करीत आहोत. त्यांनी आपल्या असामान्य आरोग्य सेवेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याचे नाव देश पातळीवर पोहचविले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे ‘साईमत’ आपले कर्तव्य मानते. पुरस्कार जरी व्यक्ती म्हणून श्रीमती बागुल यांना मिळालेला असला तरी नाव मात्र जिल्ह्याचे उंचावले आहे. त्यामुळे त्यांचे कष्ट, परिश्रम आणि सेवाभावी वृत्तीची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते, त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेलाही ‘सलाम’ असल्याचेही सुरेश उज्जैनवाल यांनी सांगितले.