लहान वयात टोकाचे पाऊल; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
साईमत /एरंडोल/प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यातील टोळी येथे १४ वर्षीय निलेश सुरेश पाटील या मुलाने राहत्या घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतक निलेश (वय १४, मूळ रा. करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे) सध्या टोळी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. ७ जानेवारी रोजी अज्ञात कारणामुळे त्याने घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच नातेवाईकांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर भिका शिंदे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. निलेशने इतक्या लहान वयात आत्महत्येस का वाटचाल केली, हे अद्याप समजू शकलेले नाही.
परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत असून, शाळा व कुटुंबातील लोकांना धक्का बसला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.
