सुधीर गाडगीळ घेतील ममता सिंधुताई सपकाळ यांची भावोत्कट मुलाखत उलगडणार जीवनप्रवास -‘‘नकुशी चिंधी ते अनाथांची माय’’

0
39

साईमत जळगाव प्रतिनिधी

‘‘नकुशी’’ म्हणजे पद्मश्री स्व.सिंधुताई सपकाळ… माईंच्या जीवनाची सुरुवात जरी नकुशीने झाली असली तरी त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या ‘जीवनाचं सोनं’ केलं. अशा या अनाथांच्या माईंना विगत दि. 4 जानेवारी 2022 रोजी परमेश्वराने त्यांच्याजवळ स्थान दिले. असे असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा ममताताई सपकाळ व सहकारी अविरत पुढे नेत आहेत.

ममताताई सपकाळ म्हणजे सिंधुताई सपकाळांची लेक होय. सिंधुताईंनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोटच्या गोळ्याचा म्हणजेच ममताताईचं काय करायचं? हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताताईंच्या समजुतदारपणामुळे व आसामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करु शकल्या. ‘माई’ या आपल्या जन्मदात्या असल्या तरी जेवढा त्यांच्यावर व त्यांच्या प्रेमावर माझा अधिकार आहे, तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला-मुलींचा आहे, हे सत्य मी कोवळ्या वयातच स्विकारले होते, असं ममताताई म्हणतात. ममताताई या कसोटीत खर्‍या उतरल्यामुळे आज महाराष्ट्रातील कित्येक मुले सुखी झाली आहेत.

प्रत्येकालाच आपल्या आईविषयी एक जिव्हाळा असतो जो शब्दात व्यक्त करता येत नाही. अनाथांची ‘माई’ मधली ‘आई’ अनुभवण्यासाठी मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि प्रस्तुत ‘‘आठवणीतील आई’’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि.18 मे 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता जळगाव शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांनी स्वीकारले आहे.

सिंधुताईंच्या पश्चात आजमितीला 210 हून अधिक अनाथ मुला-मुलींचा सांभाळ, 150 हून अधिक भाकड गाईंची सेवा माईंची लेक ममताताई तसेच दीपकदादा, अरुणभाऊ, विनयभाऊ, मनिषभाऊ यांच्यासह एकूण 64 सेवाभावी सहकारी पूर्ण निष्ठेने करीत असून माईंचे कार्य आजही सुरु आहे. ‘आठवणीतील आई’ या कार्यक्रमात सिंधुताईंचा जीवनप्रवास सांगण्यासाठी तसेच त्यांच्या पश्चात संस्थेचे कार्य, मुलांचा सांभाळ कशा पद्धतीने होत आहे या विषयावर ममता सिंधुताई सपकाळ यांची भावोत्कट मुलाखत सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत.

सदर कार्यक्रमाच्या सन्मानिकेसाठी शहरातील आकाशवाणी केंद्रासमोरील मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि येथे संपर्क साधावा. प्रवेश सर्वांसाठी खुला व नि:शुल्क आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य मिळणार असून कार्यक्रम सुरु होण्याआधी 15 मिनिटे अगोदर स्थानापन्न होण्याची विनंती आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here