‘सुधर्मा ज्ञानसभा’ संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘सुधर्मा ज्ञानसभा’ संस्थेचा २३वा वर्धापन दिन यावर्षी सातपुडा वनक्षेत्रातील शेवरे बुद्रुक छोट्याशा आदिवासी बहुल गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हा वर्धापन दिन नवीन गावात, शालेय विद्यार्थ्यांसोबत शालेय साहित्य वाटप करत तसेच निष्काम कर्म सेवा करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करत साजरा करण्याची सुधर्माची अनोखी परंपरा आहे. यंदा शेवरे बुद्रुक गावाची निवड केली होती. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला चोपडाचे शिक्षण विस्ताराधिकारी अजित पाटील, राजमल महाजन, चंद्रशेखर साळुंखे, राजेश आडवाल, सुधीर चौधरी, धानोराचे केंद्रप्रमुख राकेश पाटील, अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय प्रमोद वाघ तसेच सरपंच भूषण पाटील, उपसरपंच भीमाबाई बारेला आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे हेमंत बेलसरे, सुनीता बेलसरे, सचिव दिनकर बाविस्कर, सूर्यकांत हिवरकर, नितीन तायडे यांनी सुधर्मा संस्थेकडून गीतेची प्रत देऊन स्वागत करुन सत्कार केला.
अजित पाटील यांनी कार्याचा असाच विस्तार व्हावा, अशी शुभेच्छा दिल्या. अडावद पोलीस स्टेशनचे प्रमोद वाघ यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली. गरजू, वंचित मुलांना मदत करणे अत्यंत आनंददायी व पवित्र काम आहे. ईश्वराची पूजा समजून हे काम केले जाते, असे सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी सांगितले. कार्यक्रमात मुलांनी कविता व गाणी सादर केली.
शेकडो गरजू विद्यार्थ्यांना ‘सुधर्मा’ संस्थेचा आधार
सर्व प्रमुख पाहुणे तसेच आशा वर्कर संगीता पाटील, बिमाबाई बारेला यांचा गीते व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे शिक्षक रामकृष्ण पाटील, मीनल पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन संचालन केले. सुधर्मा संस्थेचा आधार शेकडो गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे. दुर्गम गावातील शाळेत प्रथमच असा सुंदर कार्यक्रम होत असल्याचा आनंद असल्याचे मीनल पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. शेवटी सुधर्मा संस्थेतर्फे अनंत बेलसरे यांनी आभार मानले.