
बिल वाढल्याची तक्रार, मनसेचा महावितरणला इशारा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या दोन महिन्यांपासून वीज महावितरण विभागाकडून मीटर रिडिंग घेण्याच्या तारखेत अचानक बदल केल्यामुळे जळगाव शहरातील नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी दर महिन्याच्या २५ तारखेला घेतले जाणारे रिडिंग आता २२ तारखेलाच घेतले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या अशा बदलामुळे हजारो ग्राहकांचे बिल अनाठायी वाढून येत आहे. विशेषतः ऑनलाईन रीडिंग सबमिट करणाऱ्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. ग्राहकहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्वरित व सकारात्मक दखल न घेतल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा मनसेने दिला आहे.
तक्रारींचा गांभीर्याने मागोवा घेत जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी, १८ नोव्हेंबर रोजी महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन देण्यात आले. बदललेल्या रिडिंग तारखेचा ग्राहकांवर होणारा थेट आर्थिक परिणाम, चुकीच्या रिडिंगमुळे आकारण्यात येणारे दंड व विलंब शुल्क तसेच तक्रार निवारणासाठी नागरिकांना करावा लागणारा त्रास अशा सर्व मुद्द्यांचा निवेदनात सविस्तर समावेश आहे.
मनसेच्या निवेदनानंतर महावितरणने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही, तातडीने ग्राहकांना एसएमएस, अधिकृत संकेतस्थळ व मराठी भाषेतील सूचनांद्वारे नेमकी माहिती देण्यात यावी, चुकीच्या बिलांतील सर्व दंड माफ करण्यात यावेत, पुढील काळात रिडिंगच्या तारखेत बदल करण्यापूर्वी किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे, असा मनसेचा ठाम आग्रह असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, विकास पाथरे, ॲड. सागर शिंपी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


