साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चोपडा तालुक्यातील चौगावच्या ऐतिहासिक किल्ल्यावर नुकतेच गिर्यारोहण केले. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर यांच्या मार्गदर्शनातून उपक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी तथा क्रीडा शिक्षक प्रा.नारसिंग वळवी, विद्यार्थी विकास विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष गुजराथी यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी योग्य नियोजन केले. चौगावातील विश्राम तेले यांनी प्रत्यक्ष गिर्यारोहणात सहभागी असलेल्या सर्वांना किल्ल्याविषयीची विस्तृत अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले. समाजकार्य महाविद्यालयातील सहाय्यक ग्रंथपाल परेश चित्ते, चालक नितीन पवार, उपशिक्षक जितेंद्र जोशी, देवेंद्र पाटील यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
गिर्यारोहण करतेवेळी विद्यार्थ्यांनी चौगाव येथील प्राचीन तलाव, त्रिवेणी संगम याठिकाणी भेट दिली. तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. विजयगड किल्ल्याची शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. किल्ल्यावरील कलाकुसरीने केलेले दुर्मिळ असे नक्षीकाम बघितले. किल्ल्याची रचना, भुयाऱ्यातील तलावांच्या माध्यमातून पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या सोयींची माहिती मिळविली. त्यामध्ये प्राण्यांसाठीचे पिण्याचे पाणी व मानवासाठीच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेविषयी सविस्तर माहिती मिळविली. उपक्रमात ११ विद्यार्थ्यांसह १५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यात अनिल बाविस्कर, अरुण भोई, हिमानी पाटील, दीपाली रामोशी, नेहा देशमुख यांनी उपक्रमाच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर लासुर गावाजवळील श्रीतीर्थक्षेत्र नाटेश्वर येथे सर्वांनी वनभोजन केले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाचा एक चांगला अनुभव मिळाला. त्यांच्यामध्ये ऐतिहासिक वास्तु अभ्यासाची आवड निर्माण होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
