साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण विभागाकडून प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग यांच्यावतीने पुणे समाज कल्याणचे आयुक्त यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नाशिक विभागातील विभागस्तरीय कला आणि क्रीडा अविष्कार स्पर्धेचे धुळे येथे आयोजन केले होते. स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार अशा पाच जिल्ह्यातील संघानी १००मी., २००मी., ४००मी., रिले, रस्सीखेच, लांबउडी, थाळीफेक यासोबत भुमिका अभिनय आणि नृत्य सादरीकरण अशा विविध प्रकारात सहभाग घेतला.
स्पर्धेची सुरुवात नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते फ्लग मार्च आणि क्रीडा ज्योत पेटवुन तसेच हवेत बलुन सोडुन करण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.टिळेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य शामकांत गुंजाळ, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील सामन्यांमध्ये चाळीसगाव मुलांची शासकीय निवासी शाळेच्या संघाने प्रत्येक क्रीडा प्रकारात वर्चस्व ठेवत नेत्रदीपक यश मिळविले. सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्नाखाली मुख्याध्यापक वनिता बेरड, गृहपाल दिलीप परदेशी, तालुका समन्वयक अनिल पगारे, सहाय्यक शिक्षक सोनाली महाजन, रुपाली सोनवणे, दीपाली तडवी, महेंद्र कुमावत यांनी यशस्वी खेळाडुंसाठी विशेष प्रयत्न केले होते. स्पर्धेत शासकीय निवासी शाळेचे खेळाडु यशस्वी ठरले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडुंमध्ये १०० मी. (१४ वर्षाखालील) प्रथम पुष्कराज संजय जाधव, १०० मी. (१७ वर्षाखालील) द्वितीय सम्राट अशोक सोनवणे, २०० मी. (१४ वर्षाखालील) प्रथम रवींद्र दगडू खेडकर, ४०० मी. (१४ वर्षाखालील) प्रथम सोमनाथ गरीबदास जवराळे, ४०० मी. (१७ वर्षाखालील) प्रथम विशाल सुनील गाडगे, ४०० मी. (१७ वर्षाखालील) द्वितीय खुशाल जगन्नाथ बेलदार, रिले (१७ वर्षाखालील) द्वितीय, रिले (१४ वर्षाखालील) प्रथम, लांब उडी (१४ वर्षाखालील) प्रथम पुष्कराज संजय जाधव, तृतीय समाधान सुपडू भील, लांब उडी (१७ वर्षाखालील) प्रथम जय मनोज बैसाणे, थाळीफेक (१४ वर्षाखालील) प्रथम यशवंत जिभाऊ निकम, रस्सीखेच (१७ वर्षांखालील) प्रथम निवासी शाळा चाळीसगाव, भूमिका अभिनय (पौष्टिक आहार) प्रथम, पियुष जाधव, प्रतिक पगारे, बाबी अहिरे, गौतम बागुल, निशांत जाधव, लकी देवरे यांचा समावेश आहे.
शासकीय निवासी शाळेतील मुलांनी मिळविलेल्या यशाचे, सहभागी खेळाडूंचे आणि निवासी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गृहपाल, तालुका समन्वयक अशा सर्वांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कौतुक केले आहे.