साईमत, चोपडा : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी परीक्षेचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघावा. मागील परीक्षांच्या प्रश्न पत्रिका बघून उत्तर पत्रिका लेखनाचा सराव करावा. त्याचबरोबर बहुविध विषयांचे पुस्तके, नियतकालिक तसेच वृत्तपत्रे यांचे नियमित वाचन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची आंतरिक प्रेरणा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी कौटुंबिक पाठबळ मोलाचे ठरते. स्पर्धा परीक्षेसाठी वेळ आणि अभ्यासाचे सुसूत्र नियोजन, अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांच्या बळावर निश्चितच यश मिळत असल्याचे प्रतिपादन चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्पित चौहान यांनी केले. चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र तसेच करियर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी’ विषयावरील आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राचे समन्वयक डॉ. आर. आर. पाटील आादी उपस्थित होते.
यावेळी अर्पित चौहान यांनी विद्यार्थीदशेपासून ते यूपीएससी परीक्षेत मिळविलेल्या यशापर्यंतचा प्रवास कथन केला. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून वाचन, मनन व चिंतन केले पाहिजे. ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने वाचन व जिद्द मनात बाळगून कठोर परिश्रम केल्यास यश निश्चितच प्राप्त होईल, असे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले.
याप्रसंगी एम. टी. शिंदे, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, व्ही. पी. हौसे, डी. एस. पाटील, डॉ. एम. एल. भुसारे, एस. बी. देवरे, ए. आर. देशमुख, गोपाल बडगुजर, संदीप पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी करियर कट्टाचे समन्वयक वाय. एन. पाटील, मानसमित्र समुपदेशन केंद्राचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा प्रमुख पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी करून दिला.सूत्रसंचलन व्ही. डी. शिंदे तर आभार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सदस्य एस. बी. देवरे यांनी मानले.