लांडोर खोरी वन उद्यानातील भेटीत जाणून घेतली माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील मातृभूमी रक्षक अभ्यासिका वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्याघ्र दिनाचे औचित्य साधून २९ जुलै रोजी लांडोर खोरी वन उद्यानातील भारतीय वृक्षांची माहिती, मानवास उपयुक्त आयुर्वेदिक औषधांचे उपयोग, प्रतिकात्मक वन्यप्राण्यांची माहिती देण्यात आली. तसेच खेळ खेळत प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी संकल्प केला. याप्रसंगी जळगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अजय रायसिंग यांनी वृक्षांची तर वनरक्षक मयूर पाटील यांनी वन्यप्राण्यांविषयी माहिती दिली. लांडोर खोरी वन उद्यानातील दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांसह औषधीविषयी धडे देण्यात आले. तसेच त्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र जगदीश बैरागी यांनी सापांविषयी जनजागृती करत विद्यार्थ्यांना माहिती दिली. उज्ज्वल हेल्प हॅन्ड फाउंडेशनचे गणेश राणे यांनी विद्यार्थ्यांना मोफत वाहन उपलब्ध करुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी सहभागी झालेल्या २५ विद्यार्थ्यांनी पॅगोडात बसून शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या प्रसंगावर आधारित कथा, गोष्टी सांगितल्या. तसेच वनमजुर तुकाराम माळी यांनी ‘बोलवा विठ्ठल’ असे भजन म्हणत समारोप केला. शेवटी ओजस्विनी बैरागी हिने वनविभागाचे आभार मानले.



