जी.एच. रायसोनी महाविद्यालयात आयोजित ‘युवारंग’ महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
खान्देशातून भास्काराचार्य, साने गुरूजी, शिरीष कुमार, बालकवी ठोंबरे, लता मंगेशकर, भालचंद्र नेमाडे, अभिनेत्री स्मिता पाटील, कवि ना.धो. महानोर, प्रतिभाताई पाटील, उद्योजक भंवरलाल जैन, शितल महाजन यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या क्षेत्रात नाम कमावले आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यसनमुक्त राहून ज्ञान देशासाठी अर्पण करावे, एक क्षेत्र निवडून त्यात सातत्याने सर्वोच्च स्थानी पोहचण्याचा प्रयत्न करावा, सोबतच आत्मविश्वास बाळगावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
खान्देशातील प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांना प्रेरणा मानून युवारंग युवक महोत्सवाला गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जळगावात भव्यपणे प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
उद्घाटन समारंभात मंचावर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, प्रा. कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, युवारंग कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा. एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, स्वप्नाली महाजन, प्रा. संदीप नेरकर, प्रा. मंदा गावित, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संजय शेखावत, डॉ. संजय पाटील, डॉ. विवेकानंद चव्हाण (जिल्हा समन्वयक) तसेच सर्व माजी विद्यार्थी विकास संचालक उपस्थित होते.
समारंभात विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संचालक प्रा. केशव ढाकणे, प्रा. शांताराम बडगुजर, प्रा. विलास चव्हाण, प्रा. पंकजकुमार नन्नवरे, प्रा. सत्यजित साळवे, प्रा. जी.ए. उस्मानी, प्रा. एस.टी. इंगळे, प्रा. सचिन नांद्रे, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांचा मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा.एस.टी. भुकन, अधिसभा सदस्य ऋषीकेश चित्तम, डॉ. कविता महाजन, नेहा जोशी, वैशाली वराडे, व्ही.टी. जोशी, नितीन ठाकूर, दीपक पाटील, भानुदास येवलेकर, प्रा. गजानन पाटील, ॲड.केतन ढाके, केदारनाथ कवडीवाले यांच्यासह सहभागी विद्यार्थी, व्यवस्थापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठाच्या युवारंगाला थीम बेस करण्याचे गेल्या तीन वर्षापासून सुरु केले आहेत. राज्यात हा प्रयोग प्रथम आपल्या विद्यापीठाने सुरु केला त्याचे अनुकरण आता इतर विद्यापीठे करीत आहेत. यंदा बकीमचंद्र चटोपाध्याय लिखीत ‘वंदे मातरम’ राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने ही थीम दिली आहे. विद्यापीठाने चांगला नावलौकीक व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेल्या योगदानामुळे एनआयआरएफ रँकींगमध्ये आपले ५१ ते १०० मधील स्थान कायम ठेवले असल्याचे स्वागताध्यक्ष राजू नन्नवरे यांनी सांगितले.
युवारंग ही स्पर्धा सहभागासाठी आहे. जिंकणे किंवा हरणे महत्वाचे नाही तर अनुभवातून शिकणे महत्त्वाचे असल्याचे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. युवारंग महोत्सवाची परंपरा २५ वर्षांची आहे. विद्यापीठाने ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुसंस्कारी नागरिक बनवले आहे. यंदाच्या महोत्सवाची थीम “वंदे मातरम १५० वर्षे” ठेवण्यात आली आहे. राष्ट्रगीत केंद्रस्थानी राहून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अभिमान आणि राष्ट्रभक्तीची शिकवण दिली जात आहे.
युवारंग महोत्सवाची वैशिष्ट्ये अशी
‘मेक इन इंडिया’ विषयक विद्यार्थ्यांनी तयार केलेला लोगो, एआय-युवा-किंबा : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहायक, जो महोत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना देईल. युवारंग महोत्सवात विद्यार्थ्यांचा ४० टक्के तर ६० टक्के विद्यार्थिनींचा सहभाग आहे. युवारंगात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच २५० स्वयंसेवक विद्यार्थी परिश्रम घेत असल्याचे महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभात ध्वजारोहण
उद्घाटन समारंभात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी (विद्यापीठ ध्वज), डॉ. जयेंद्र लेकुरवाळे (युवारंग ध्वज), डॉ. प्रिती अग्रवाल (महाविद्यालय ध्वज) तर राष्ट्रगीत, राज्यगीत, विद्यापीठ गीत आणि युवारंग गीत गायले गेले. सुमीत खैरे ह्या विद्यार्थ्याने प्रतिज्ञा दिली.
प्रामाणिकपणे काम करून राष्ट्र प्रथम ठेवावे
राष्ट्रगीतातून राष्ट्राचे ऐक्य, धैर्य, शौर्य, अभिमान आणि अखंडता स्पष्ट होत असल्याचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे काम करून राष्ट्र प्रथम ठेवावे, शिक्षणाद्वारे समिक्षात्मक विचार, अस्तित्व टिकवण्याचे कौशल्य व भावनिक बुध्दीमत्ता या गुणांची जोपासना करावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ गाण्याने झाली. जे विवेकानंद प्रतिष्ठानच्या कलाकारांनी सादर केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील तर आभार समन्वयक प्रा. संजय शेखावत यांनी मानले.