साईमत, चोपडा : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीनंतर आपले करिअर निवडताना आपल्याला हवे ते क्षेत्र निश्चित निवडावे. परंतु त्यापूर्वी त्या क्षेत्रात आपल्याला यश न मिळाल्यास प्लॅन ‘बी’ तयार असू द्यावा, असे मत हरताळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित हरताळकर यांनी व्यक्त केले. चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात नुकताच झाला. त्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजनासह दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य पाटील, जैनब तडवी, सत्यम सोनवणे, तनीष लाठी, लतिका निकम, अवनी वानखेडे, तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगतातून त्यांच्या बालांगणापासून तर दहावीपर्यंतचे अनुभव व्यक्त करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. शिक्षकांमधून संदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक-अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, आशा चित्ते, प्राचार्य पी. जी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय पवन लाठी यांनी करुन दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र भावे, सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी तर आभार जावेद तडवी यांनी मानले.