साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ज्ञानार्जनावरच भर द्यावा. आपल्या आई-वडिलांचे, महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी केले. येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयात आयोजित बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती सदस्य भरत पाटील (नगरसेवक, बोदवड) उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील म्हणाले की, महाविद्यालयातील सुख सुविधा तसेच उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. जसे की डिजिटल क्लासरूम फॅसिलिटी, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व सायन्स विभागातील मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स या प्रयोगशाळा व इतर अद्ययावत साहित्य उपलब्ध आहेत. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या धर्तीवरील सुखसुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, असे सांगितले.
भरत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, मोबाईलचा वापर कमी करावा, संस्थेचे, कॉलेजचे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. भविष्यात तुमच्याकडून चांगली सेवा घडो, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी जळगाव येथील बांभोरी कॉलेजचे डॉ. जे.बी.सिसोदिया, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. काटे, राजपूत करणी सेनेचे प्रमुख विलाससिंग पाटील, प्रा.बी.जी.माळी, आर. सी. पाटील, जगदीश सिसोदिया उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस.एस.गड्डम तर आभार प्रा. व्ही. पी. परिहार यांनी मानले.