साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जीवन जगले पाहिजे. त्यासाठी आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञानाची आवश्यकता आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन संस्कृतीतून कशी क्रांती घडविली. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन आणि त्यांच्या कक्षा रूंदावण्यासाठी सर्वांगिण व्यक्तीमत्त्व विकासासाठी अभ्यासक्रमाच्या पुस्तकासमवेत अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन प्रा.सिद्धार्थ झनके यांनी केले. त्यांनी इतर महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दाखले देत विद्यार्थ्यांना मार्मिक हितोपदेश दिला. स्थानिक म्युनिसिपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एस. राठोड होते.
यावेळी ॲड. संजयसिंह ठाकूर, प्रा. वर्षा देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले. डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना वाचनातून मनुष्य किती प्रगल्भ होतो तथा ग्रंथ हे आयुष्यभर मित्र कसे असतात, याविषयी डॉ. कलाम यांनी जगाला कसा संदेश दिला. आपल्या संस्थेत वाचन कट्टा आणि त्याची भुमिका कशी असेल, याबद्दल विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मार्मिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुजाता भालेराव यांनी कार्यक्रमाचे फलक लेखन केले. यशस्वीतेसाठी लिपिक सुरेश इंगळे, प्रा.बाळकृष्ण कुरंगळ, प्रा. योगेश मांडेकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन तथा प्रास्ताविक सुनील आर. निवाणे तर आभार विनोद सोनवणे यांनी मानले.