चोपडा महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात समीक्षक प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे प्रतिपादन
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
कौशल्य विकासासाठी जिद्द व मेहनत हवी. शिकण्याच्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम भाषा विभाग करतो. स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी भाषिक कौशल्ये आत्मसात करावी. त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. मराठी भाषा विषयाकडे करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी बघावे, असे प्रतिपादन
कन्नड शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र प्रमुख साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ.शिवाजी हुसे केले. येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘तिफणकार’ तसेच प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे ‘मराठी भाषा कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी’ विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. शिवाजी हुसे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी तसेच सौ.एम.टी.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नितेश सोनवणे, शुभांगी पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. एन.सोनवणे, सूत्रसंचलन डॉ.एम.एल.भुसारे तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले.