उज्ज्वल स्कूलमध्ये विषय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केले अनोखे प्रकल्प
साईमत / जळगाव / प्रतिनिधी
उज्ज्वल स्कूलमध्ये “विषय मेळावा २०२४” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, इतिहास, आणि भूगोल या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे आणि सखोल शैक्षणिक ज्ञानाचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या अध्यक्षा अनघा गाडगानी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रविण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला परीक्षक म्हणून डॉ. रेणुका चव्हाण, प्रा. प्रमोद समाधान भोई, आणि प्रा. डॉ. अतुल सोपानराव इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण केले.
विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात सौर ऊर्जा, रोबोटिक्स, आणि पर्यावरण संवर्धनासारख्या अद्ययावत विषयांवर प्रकल्प सादर केले. सौर उर्जेच्या वापराचे महत्त्व पटवून देणारा सब्जी मंडी प्रकल्प विशेष आकर्षणाचा विषय ठरला, ज्यात कमी खर्चात भाज्यांना सौर उर्जेच्या माध्यमातून जास्तकाळ कसे टिकवून ठेवता येईल यावर उपाय सांगितले गेले. विज्ञानातील इतर प्रकल्पांमध्ये रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानाचा पर्यावरण संवर्धनात उपयोग यांसारख्या विषयांवर जोर देण्यात आला.
गणित विषयात विद्यार्थ्यांनी विविध गणन पद्धती आणि प्राचीन भारतीय गणिताच्या संकल्पनांवर प्रकल्प सादर केले. प्रकल्पांच्या माध्यमातून गणितातील काही जटिल संकल्पना दैनंदिन जीवनात कशा उपयोगात येऊ शकतात, याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने गणितातील घातांक, वर्गमूळ यांसारख्या संकल्पना मांडून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. इतिहास विभागात, विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकल्प सादर केले.
महात्मा गांधी, भगतसिंग यांच्या योगदानावर आधारित प्रकल्पांनी स्वातंत्र्यचळवळीतील ऐतिहासिक घटनांचे विवेचन केले. तसेच, मुगल समाजसमाजसुधारकांच्या इतिहासावर संशोधन करून विद्यार्थ्यांनी या काळातील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करून सादरीकरण केले.
भूगोल विभागात, विद्यार्थ्यांनी पृथ्वीची रचना, हवामान बदल, आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यावर आधारित प्रकल्प सादर केले. विशेषतः, भूकंप, पूर, वादळ यांसारख्या आपत्ती कशा हाताळाव्या आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल, याचे सखोल स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी दिले. पर्यावरणीय संकटावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रकल्पांनी विशेष दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनघा जोशी यांनी केले. तर शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रकल्पांना दिशा दिली. सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.