वारकऱ्यांचे रूप परिधान करून विद्यार्थ्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सादरीकरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेषभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुरुवातीला पालक संघाच्या सदस्य श्वेता लढ्ढा, लतिका राजपूत यांच्या हस्ते विठोबा, सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विठोबा, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, वारकऱ्यांचे रूप परिधान करून सादरीकरण केले.
शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांनी विधीपूर्वक पालखी पूजन केले. त्यानंतर शाळेपासून पिंप्राळा येथील भवानी मंदिरापर्यंत पारंपरिक दिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, ढोल, वीणा अशा पारंपरिक वाद्यांसह “विठ्ठल…विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” अशा भक्तिगीतांच्या जयघोषात सहभाग घेत धार्मिक वातावरणात एकतेचा संदेश दिला.
एकात्मतेचा संदेश देणारा ठरला कार्यक्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे शाळेचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. शाळेचे उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी हा कार्यक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव, सांस्कृतिक जाणीव आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरल्याचे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक मनोज शिरोळे, पालक-शिक्षक संघाचे सदस्य, अनेक पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन दुसरीचा विद्यार्थी गौरांग जाधव, रिध्दी पाटील यांनी केले.