शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा ट्रॉफीसह प्रमाणपत्र देऊन गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील रायसोनी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘मंथन’ स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने ट्रॉफीसह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय अशा विविध गटातील अनेक विद्यार्थ्यांनी यशात आपला ठसा उमटविला आहे.शाळेच्या यशात शिक्षकांसह पालक, विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी सांगितले.
रायसोनी स्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय वेळेतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून दिली जाते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकतेकडे झुकणारा दृष्टिकोन यासाठी शाळेने नर्सरीपासूनच स्पर्धा परीक्षा अनिवार्य केली आहे. अशा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतच मार्गदर्शन केले जाते. त्यात स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम शिकविणे, वर्कबुक्सचे समाधान करून घेणे आणि नियमित सराव चाचण्यांची रचना अशा सर्व बाबींचा समावेश आहे. प्रत्येक शिक्षकाला विशिष्ट वर्गाची जबाबदारी दिल्यामुळे मार्गदर्शन अधिक प्रभावी ठरत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
रायसोनी स्कूल ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भावी आयुष्यासाठी सक्षम बनवत आहे, हे तिचे वेगळेपण अधोरेखित करणारे ठरले आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मार्गदर्शकांनी कौतुक केले आहे.