कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दिले मूर्ती बनविण्याचे धडे
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रेमनगरातील स्थित सीबीएसई पॅटर्न बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेत गणपती मूर्ती बनविण्याचे धडे देण्यात आले. अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचविण्यात आला.
कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक साहित्य घरूनच आणून स्वावलंबन आणि क्रिएटिव्हिटीचे उत्कृष्ट दर्शन घडविले. कार्यशाळेदरम्यान पूनम अत्तरदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आकर्षक शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या.
संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन
उपक्रमातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी जागरूकता वाढविण्याबरोबरच शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करण्याचा संदेशही देण्यात आला. शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले. त्यांनी पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रायसोनी शाळेत इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या उपक्रमातून हरित सणाचा संकल्प दृढ करण्यात आला.