अभिनव कार्यशाळा यशस्वी ठरली ; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक आकर्षक आणि सोपे करण्याच्या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या साहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘एआय’च्या मदतीने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्हिडिओ बनवले. अभिनव अशा कार्यशाळेचे शिक्षकांसह पालकांनी कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचा सूर उमटला. कार्यशाळेला शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील संपूर्ण व्याकरणाचा भाग ‘एआय’च्या मदतीने तयार केला. त्याचे शैक्षणिक व्हिडिओ बनविले. विद्यार्थ्यांचा हा अभिनव प्रयोग शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सृजनशीलतेलाही चालना मिळाल्याचे निरीक्षण करण्यात आले. कार्यशाळेत विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गोहील यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारा उपक्रम
‘एआय’मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवे आयाम मिळतील, असे प्रेमचंद ओसवाल यांनी सांगितले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारा असल्याचे मंगला दुनाखे यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिक्षण अधिक सोपे व आकर्षक बनवतो, असे मत सचिन दुनाखे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ हे एक आदर्श उदाहरण असल्याचे संगीता गोहील यांनी सांगितले.
मराठी व्याकरणाचे व्हिडिओ तयार
उपक्रमाला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी एआयच्या साहाय्याने मराठी व्याकरणाचे व्हिडिओ तयार केले, ही बाब अभिमानास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अभिनव कार्यशाळेत शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अशा उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
