बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये ‘बैलपोळा-तान्हा पोळा’ सण साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील सीबीएसई पॅटर्न बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये पारंपरिक ‘बैलपोळा-तान्हा पोळा’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी ते सिनिअर केजीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घरून रंगीबेरंगी मातीचे बैल सजवून शाळेत आणले होते. शेतकऱ्यांच्या वेषभूषेतील विद्यार्थी पाहून वातावरणात ग्रामीण संस्कृतीची ‘झलक’ खुलवली होती.
लहान वासरांना सजवून त्यांना हळदी-कुंकवाचा मान देऊन गोडधोड खाऊ घालून साजरा केला जाणारा पारंपरिक सण म्हणजे ‘तान्हा पोळा’. मुले सणात घरगुती मातीच्या बैलांना सजवितात. वासरांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन कृषी प्रधान संस्कृतीचा आनंद घेतात. शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाचे ग्रामीण जीवनाशी असलेले महत्व समजावून सांगितले. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या सदस्या माला माळी तसेच शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपक्रमातून ग्रामीण परंपरा, कृषी संस्कृतीचा वारसा चिमुकल्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न शाळेमार्फत यशस्वीरित्या पार पडला.