रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा, वृक्षांना जपण्याचा केला संकल्प
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये (सीबीएसई पॅटर्न) रक्षाबंधननिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता सातवी ते दहावीमधील विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केली. त्या झाडांना राखी बांधून त्यांच्याशी बंध बांधला. अशा अनोख्या उपक्रमाअंतर्गंत विद्यार्थिनींनी दररोज शाळेत आल्यावर झाडांना पाणी घालण्याचा, त्यांचे संगोपन करण्याचा आणि वृक्षांना आपल्यासारखे जपण्याचा संकल्प केला. भावनिक नात्याशी जोडलेला उपक्रम शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ सारख्या उपक्रमांना चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपक्रमानिमित्त रक्षाबंधन सणाची नवी रूपरेषा शाळेत पहायला मिळाली. शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले. शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी विद्यार्थिनींच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. निसर्ग रक्षणाच्या दिशेने उचललेले पाऊल निश्चितच भावी पिढीला हरित आणि शाश्वत जीवनशैलीकडे घेऊन जाणारे ठरणार असल्याचा सूर उपक्रमाद्वारे उमटला.