महिलांचा धडकला निषेध मोर्चा
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर गेल्या २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता झालेल्या भ्याड हल्ल्याला तिसरा दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात अपयश आले आहे. चौधरी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रभागातील नागरिकांसह महिलांनी शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी हॉटेल सदानंदपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढून शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना निवेदन सादर केले.
गुन्ह्यातील सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार उघडकीस यावा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अमानवीपणे वार करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे, सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, आदी मागण्या महिलांनी केल्या आहे. मोर्चावेळी महिलांनी प्रचंड घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाने आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण परिसरात तीव्र निषेध होत आहे. या प्रकरणाचा तातडीने आरोपींचा शोध घेत अटक करण्याची मागणीही होत आहे.