मनपाने राबविली धडक कारवाई; ३ तासांत २० लाखांचा थकीत कर वसूल
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने शुक्रवारी एमआयडीसी परिसरात धडक कारवाई राबवून थकबाकीदारांविरुद्ध कडक पावले उचलली. अवघ्या तीन तासांच्या मोहीमेअंतर्गत विभागाने तब्बल २० लाख रुपयांचा थकीत मालमत्ता कर वसूल केला.
अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता सुरू झालेली ही कारवाई दुपारी १ वाजता संपली. या मोहीमे दरम्यान कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांना तातडीने सील ठोकण्यात आले; मात्र, कारवाईची तीव्रता पाहून मालकांनी थकीत रक्कम तातडीने भरण्यामुळे काही वेळानंतर ही सील काढण्यात आली.
मोहीमेतील उपस्थितांमध्ये प्रभाग अधिकारी मनोज वन्नेरे, शाखा अभियंता प्रकाश पाटील, चंद्रशेखर कोळी, चेतन खोंडे यांच्यासह कर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. अनेक कंपन्यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तत्काळ धनादेश किंवा रोख रकमेने कर भरणे पसंत केले.
सहायक आयुक्त शोभा बाविस्कर यांनी सांगितले की, १९ मार्चपर्यंत थकबाकीदारांना संधी आहे. यानंतर जप्तीची कारवाई कठोर स्वरूपात केली जाईल. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट जप्तीची “तलवार” लटकवली जाईल.
महानगरपालिकेच्या या शास्ती योजनेमुळे थकबाकीदारांना आपली थकीत रक्कम वेळेत भरून दंड वाचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकारच्या कडक कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.
