निवडणूक काळात गुन्हेगारीवर लगाम; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई
साईमत / जळगाव /प्रतिनिधी
आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाविना पार पडावी, यासाठी जळगाव पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल २४ सराईत गुन्हेगारांना शहराबाहेर हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी
कार्यालयाने निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी स्थितीचा सखोल आढावा घेत संबंधित प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर विचार करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हद्दपारीच्या आदेशांना मंजुरी दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १८ तर जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६ अशा एकूण २४ सराईत गुन्हेगारांना जळगाव शहराच्या हद्दीतून तात्पुरते बाहेर काढण्यात आले आहे.
हे हद्दपारीचे आदेश ४ जानेवारी २०२६
रोजी मध्यरात्रीपासून लागू झाले असून १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संबंधित गुन्हेगारांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारे शहरात प्रवेश केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा
हक्क महत्त्वाचा असल्याने हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अटींसह मतदानाची संधी देण्यात आली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी या इसमांना केवळ दोन तासांची मर्यादित परवानगी देण्यात आली असून, त्या कालावधीत त्यांनी मतदान करून तात्काळ जळगाव शहराची हद्द सोडणे बंधनकारक राहणार आहे. या सवलतीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक काळात दहशत,
बळजबरी, मतदारांवर दबाव किंवा हिंसक प्रकार रोखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी घडलेल्या अनुचित घटनांचा अनुभव लक्षात घेता यावेळी आधीच खबरदारी घेतली जात असल्याचेही सूत्रांकडून समजते.
या निर्णयाचे शहरातील सुजाण नागरिक,
सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. “निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून तो निर्भय वातावरणातच साजरा झाला पाहिजे. पोलिसांची ही कारवाई योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या ठोस भूमिकेमुळे जळगाव शहरात निवडणूक काळात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे चित्र आहे.
