साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मुंबई पोलीसमध्ये कार्यरत शुभम अनिल आगोणे याची गेल्या १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजेच्या दरम्यान पाटणादेवी रोड बामोशी बाबा दर्गा समोर क्रिकेटच्या कारणावरून चाळीसगाव येथील सराईत गुन्हेगारांनी तीक्ष्ण तलवारी व चॉपरच्या साह्याने हत्या केली होती. पोलीस कर्मचाऱ्यांवर गावगुंडाकडून असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी तरी कुणाकडे? असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे. भर दिवसा तलवारी काढून एका पोलिसावर हल्ला करण्याची हिम्मत सराईत गुन्हेगार करतात. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था पणाला लागल्याचे चित्र सर्व सामान्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांना वेळीच पायबंद न घातल्यास दिवसाढवळ्या सामान्य जनतेचे हाल होतील. त्यामुळे शुभम आगोणेची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन द्यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन सकल धनगर समाज, मित्र परिवारांतर्फे मंत्री ना.गिरीष महाजन यांना नुकतेच दिले आहे. निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे.
निवेदनातील मागण्यांमध्ये फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, आरोपींची केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, आरोपी हे परंपरागत समाजविघातक प्रवृत्तीचे आहेत. सराईत गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांना खटल्यामध्ये फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
