महापौरांचा इशारा; उघड्या विहिरी त्वरित बंद करा, अन्यथा कारवाई
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत असलेल्या उघड्या आणि असुरक्षित विहिरींमुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला मनोज काळे यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी मनपा आयुक्तांना लेखी पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
जळगाव शहरात पाणीपुरवठ्यासाठी अनेक सार्वजनिक विहिरींचा वापर केला जात असला, तरी सध्या अनेक विहिरी उघड्या अवस्थेत असून त्यांची कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी गंभीर चिंता महापौरांनी व्यक्त केली आहे.
महापौर काळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व उघड्या विहिरींची तातडीने पाहणी करून त्या सुरक्षितपणे बंदिस्त करण्यात याव्यात. याशिवाय, ज्या विहिरी सध्या वापरात नाहीत आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत, त्या विहिरी तत्काळ बुजवून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
केवळ सार्वजनिक विहिरींचाच विचार न करता, खाजगी मालकीच्या उघड्या विहिरींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा विहिरींच्या मालकांना नोटिसा बजावून आवश्यक ती कार्यवाही करण्यास भाग पाडावे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
महापौरांनी घेतलेल्या या ठोस आणि आक्रमक भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आता महानगरपालिका प्रशासन या आदेशांची अंमलबजावणी किती वेगाने करते, याकडे संपूर्ण जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
