दोन सत्रात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून परीक्षा विभाग प्रमुख डॉ.के.एस.भावसार व मानसशास्त्र विभाग एस.बी.पाटील उपस्थित होते. व्यापीठावर प्रा.सौ.एस.टी.शिंदे, विद्यार्थी विकास विभागअधिकारी डॉ.डी.डी. कर्दपवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी विद्यार्थ्यांना ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेची माहिती दिली. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मार्गदर्शक डॉ.के.एस.भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, विद्यार्थ्यांनी कॉपी न करता कॉपी मुक्त परीक्षा दिली पाहिजे, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही. तसेच विद्यापीठ कॉपी केस संदर्भात पीपीटीच्या माध्यमातून सांगताना कॉपीचे प्रकार, त्यासंदर्भातील विद्यापीठ नियमांची माहिती विस्तृतपणे दिली. कॉपी मुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक एस.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा’ विषयावर मार्गदर्शन करताना, ताण-तणाव म्हणजे काय? ताण-तणावाचे नियोजन कसे करता येईल? यासंदर्भात पीपीटीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीत ताण न घेता योग्य पोषण आहार घेतले पाहिजे, अभ्यासाचे नियोजन करून त्यानुसार अभ्यास केल्यास ताण कमी होईल, यासंबंधी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन जयश्री शिंदे तर आभार गंगा करनकाळे हिने मानले.