Streetlights In Sony Nagar : सोनी नगरातील पथदिवे रात्री बंद, दिवसा सुरू

0
6

अंधाराचा फायदा घेत चोरट्यांची मुजोरी वाढली

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात पथदिव्यांच्या बेजबाबदार व्यवस्थापनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री पथदिवे बंद आणि दिवसा सुरू राहणे, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम गुन्हेगारीत वाढीवर होत असल्याचे समोर आले आहे. पहाटे ३ ते ४ दरम्यान झालेल्या दोन घरफोडींमध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सोनी नगरातील चारही गल्ल्यांमध्ये अनेक पथदिवे कायमस्वरूपी बंद आहेत तर काही पथदिवे रात्री ११ वाजता बंद होतात आणि सकाळी ६ वाजता सुरू होऊन दिवसभर सुरुच राहतात. अशा कारणामुळे रात्री परिसरात अंधार पसरतो. त्यामुळे चोरट्यांना मुक्तपणे वावरण्याची संधी मिळते, अशी नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली. चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दोन बंद घरे टार्गेट करून घरफोडी केल्या. पथदिवे व्यवस्थित सुरू नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा परिसरातील नागरिकांनी आरोप केला आहे.

बंद दिव्यांची तात्काळ दुरुस्ती करावी

सोनी नगरातील परिसरात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व पथदिवे सुरू ठेवावेत, बंद दिव्यांची तात्काळ दुरुस्ती करावी आणि वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी सोनी नगरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here