गटारीतील सांडपाणी परिसरात पसरल्याने दुर्गंधी
साईमत /चाळीसगाव/ प्रतिनिधी
शहराच्या मध्यवर्ती भागातील बाराभाई मोहल्ला, वॉर्ड क्रमांक १६ येथे गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या गटारी व बंद पथदिव्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सत्यविजय फाउंडेशनचे अध्यक्ष तनवीर शेख बदरुद्दीन यांच्या घरासमोरील गटार पूर्णपणे तुडूंब भरली आहे. मागील महिनाभरापासून सांडपाणी पुढे जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
तुंबलेल्या गटारीमुळे संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना घरात थांबणेही कठीण झाले आहे. दुर्गंधी, साचलेले पाणी आणि घाण यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याचबरोबर, वॉर्ड क्रमांक १६ बाराभाई मोहल्ल्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री व पहाटेच्यावेळी बाहेर पडणे धोकादायक वाटत आहे. विशेषतः पहाटे नमाजासाठी जाणारे मुस्लिम समाजबांधव तसेच वृद्ध, महिला व लहान मुलांना अशा सुविधेचा सामना करावा लागत आहे.
स्ट्रीट लाईट सुरू ठेवणे ही मूलभूत गरज असताना सलग अनेक दिवस पथदिवे बंद राहणे हे नगरपालिकेच्या वीज वितरण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्व गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत सत्यविजय फाउंडेशनचे अध्यक्ष तनवीर बदरुद्दीन शेख व परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने पथदिवे दुरुस्त करण्याची तसेच तुंबलेल्या गटारी त्वरित मोकळ्या करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
