मुंबईच्या उत्कर्ष फाउंडेशनला कार्यादेश, प्रत्येक श्वानाची नोंद बंधनकारक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसागणिक वाढला आहे. अखेर महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबईतील ‘उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनला’ कार्यादेश देण्यात आले. येत्या शुक्रवारी, १ ऑगस्टपासून कुत्रे पकडण्यास सुरूवात होईल. तीन वर्षासाठी कुत्रे निर्बिजीकरणाची जबाबदारी आता फाउंडेशनची असणार आहे.
गेल्या महिन्यात चार वर्षीय बालकाचा मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर झोपलेले प्रशासन जागे झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. अखेर पाच निविदा आल्यावर मुंबईच्या उत्कर्ष फाउंडेशनला कार्यादेश देण्यात आले. प्रती श्वानप्रमाणे फाउंडेशनला १ हजार १९९ रूपये खर्च दिला जाणार आहे. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना ॲन्टी रेबीज लस टोचून उजव्या कानावर ‘व्ही नॉच’ केल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी सोडावे लागेल.
प्रत्येक श्वानाची नोंद घ्यावी लागणार
मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालय आवारातील खोल्यांमध्ये श्वानांची शस्त्रक्रिया होईल. प्रजनन शस्त्रक्रिया, श्वानदंश लस देणे आदी शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांवर पुढे पाच दिवसापर्यंत औषध उपचार करणे, ओळख चिन्ह लावणे, दिवसातून दोन वेळा खानपान करावे लागेल. प्रत्येक श्वानाची नोंद घ्यावी लागणार असल्याची माहितीही मनपातील सूत्रांनी दिली.