जामनेरात ओबीसी समाजासह समता परिषदेतर्फे तहसिलदारांना निवेदन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शासनाने आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा पूर्णपणे असंवैधानिक आहे. तो तात्काळ रद्द करण्यात यावा, सरकारने यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग (एसबीसी) प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. शासनाच्या दबावाखाली न्या. शिंदे समितीच्या माध्यमातून ५३ लाखांहून अधिक बोगस कुणबी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसविण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ आघात आहे. न्या. शिंदे समिती पक्षपाती पद्धतीने काम करीत आहे. ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर घुसखोरी थांबवा, अशी मागणी जामनेर शहरासह तालुक्यातील समस्त ओबीसी समाज तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली आहे. अशा आशयाचे निवेदन सोमवारी, ८ सप्टेंबर तहसिलदारांना देऊन त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे.
निवेदनात हैदराबाद गॅझेटिअरवरील शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करावा, ओबीसींमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ५३ लाख बोगस कुणबी नोटी रद्द कराव्यात, न्या. शिंदे समितीचे कामकाज पक्षपाती व अन्यायकारक असल्याने ती तात्काळ बरखास्त करावी, ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची होत असलेली बेकायदेशीर घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश नमूद केला आहे.
घटनाबाह्य आंदोलन उभारून शासनावर दबावतंत्र वापरण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविला जात आहे. आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणे हा मूळ ओबीसी घटकांचा संहार करण्याचा डाव आहे. त्याला शासनाने साथ देणे हे गंभीर अपराधासमान आहे. गतकाळात महाराष्ट्र अनेकवेळा बेकायदेशीर आंदोलनाने होरपळला आहे. परंतु शासनाने दबावाखाली न जाता घटनात्मक तत्त्वांचा विचार करुन ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, त्यातील उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनावर राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर यांच्याहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर उत्तम पवार, अरुण माळी, मुकुंदा माळी, अरुण महाजन, सुरेश महाजन, डॉ.संजय सोनवणे, पवन माळी, नरेश महाजन, विनोद माळी, सत्यवान घोंगडे, गोपाल माळी, विनायक चौधरी, गणेश झाल्टे, रुपेश महाजन, बाळु चवरे, सारंगधर अहिरे, रवींद्र झाल्टे, रमेश वराडे, रवी झाल्टे, कैलास माळी यांच्यासह जामनेर शहरासह तालुक्यातील समस्त ओबीसी समाज तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.