सावद्यात पताका लावण्याच्या शुल्लक कारणावरून दगडफेक

0
6

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

येथील बुधवार पेठ येथे शुक्रवारी, १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पताका लावण्याच्या शुल्लक कारणावरून दगडफेक झाली. याठिकाणी काही कार्यकर्ते चौक सुशोभिकरणाचे काम करीत असतांना याठिकाणी पताका लावण्याचे शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे परिस्थिती तणावग्रस्त निर्माण झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविले. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असून निंभोरा, फैजपूर, सावदा, वरणगाव येथील पोलिसांना पाचारण केले आहे.

मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपोनि विनोद खांडबहाले, निंभोऱ्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ आदी दाखल झाले होते. रात्रीपासून डीवायएसपी राजकुमार शिंदे हे तळ ठोकून होते. शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मध्यरात्री भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पीआय किसन रंजन पाटील, रावेर-यावल तालुक्याचे महसूल उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, रावेरचे तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सावदाचे तलाठी रशीद तडवी उपस्थित होते. शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहरात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सण, उत्सव असल्यास दोन्ही समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी संबंधिताबरोबर उपस्थित राहून सामंजसपणाने जातीय सलोख्याचे धार्मिक सण व उत्सव आनंदाने पार पाडावे जेणेकरून अशा शुल्लक घटना यापुढे होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापुढे संवेदनशील भागात पोलिसांकडून लक्ष देणे गरजेचे आहे.

२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दगडफेकीत जमाव पांगविण्याकरीता कर्तव्यावरील एका पोलीस कर्मचाऱ्याला खांद्यावर आणि पोटावर मार लागला होता. म्हणून पो.कॉ.मनोज रुबाब तडवी यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात शरीफ बिस्मील्ला आणि मोईन सलिम सैय्यद यांच्यासह इतर २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here