जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांच्या भूमिकेची उत्सुकता
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगावच्या नवी पेठेतील ‘दगडी बँके’च्या इमारत विक्रीच्या प्रस्तावाबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या विक्री प्रस्तावावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त करत आपला विरोध स्पष्ट केला आहे. तर यापूर्वी ज्येष्ठ संचालक आ. एकनाथराव खडसे, आ.अमोल पाटील यांनीही विरोध दर्शविला आहे. ही स्थिती पाहता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
दगडी बँक इमारत विक्रीच्या प्रस्तावावर जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. सर्वात आधी आ.खडसे यांनी जाहीररित्या आपला विरोध दर्शविला होता. त्यांच्या विरोधाला जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी त्वरित प्रत्युत्तर देत जे सहकारी साखर कारखाने विक्री केले गेले, तेव्हा श्री.आ.खडसेंना शेतकऱ्यांच्या भावना दिसल्या नाहीत का…? असा प्रश्न उपस्थित केला होता. तथापि, श्री.पवार यांच्या प्रश्नावर अत्यंत मार्मिक आणि व्यवहारिक उत्तर दिले होते. त्यानंतर जि ल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट दगडी बँकेची इमारत विकण्याची गरजच काय…? तुम्हाला पैशांची कडकी लागली आहे का…? असा खरमरीत प्रश्न करत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, श्री.पवार यांनी पालकमंत्र्यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर अद्याप दिलेले नाही. आ.श्री.खडसे यांनी केलेल्या विरोधावर प्रत्यत्तर देण्याची जेवढी तत्परता श्री.पवार यांनी दाखवली, तशी पालकमंत्र्यांच्या विरोधात दाखवतील का…? असा प्रश्नही शेतकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. या प्रकरणात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया काय असू शकते…? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
दगडी बँकेच्या इमारतीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेतील प्रस्तावित नोकर भरतीबाबत ही चर्चा सुरू आहे नोकर भरतीबाबत जिल्हा बँकेकडून विलंब का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहे. बँकेच्या बहुतांश संचालकांना बँकेची प्रस्तावित नोकर भरती पूर्णतः पारदर्शकपणे तसेच कुठलीही वशिलेबाजी अथवा भ्रष्ट पद्धतीचा अवलंबून न होता व्हावी, अशी अपेक्षा आहे.
मंत्री महाजनांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता
दगडी बँक इमारत विक्री प्रस्ताव आणि प्रस्तावित नोकर भरतीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी किंवा त्यांची याबाबत भूमिका कोणती ते स्पष्ट करावे, अशी जिल्ह्याभरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.